देवेंंद्र फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता कधी होणार? असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारला जात आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमुळं मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा आरोपही केला जात आहे. या सर्व टीकांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असे कोठेही म्हटलेले नाही. सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नाही. मंत्रिमंडळ विस्तार १५ऑगस्टच्या आधी होईल आणि लोक विचार करत आहेत त्यापेक्षाही हा विस्तार लवकरच होईल असे स्पष्ट करत विरोधकांचं तोंड गप्प केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मंत्रिमंडळ विस्तारावरून वारंवार टीका करत असल्याचे दिसून येत आहेत. पवार यांनी एक महिना झाला मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. प्रत्येकवेळी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना मिडिया विचारतो कधी ? त्यावर लवकरच , लवकरच एवढेच शब्द येतात. होईल पण मंत्रिमंडळ विस्तार होणार कधी अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेलाही फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार १५ ऑगस्टच्या आधी होईल अशा शब्दात उत्तर दिलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनीही शनिवारी दिल्लीमध्ये बोलताना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणतीही अडचण नसल्याचं म्हटलं आहे.
राजकारणासाठी डायलॉगबाजी
मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यात आल्यानंतर सचिवालयाचे मंत्रालय होते आता मंत्रालयाचे सचिवालय झाले अशी टीका होत आहे. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले महिती असतानाही राजकारणासाठी डायलॉगबाजी केली जाते. हे अधिकार फक्त क्वासी ज्युडिशरी प्रकरणांच्या सुनावणीसाठी दिलेले आहेत. आधीच्या सरकारमध्येही अनेक सचिवांना अधिकार होते. आमच्या सरकारच्या काळातही त्यावेळी मंत्र्यांनी अनेक सचिवांना अधिकार दिले होते. महाराष्ट्रात नाही देशात ही परंपरा आहे. त्यामुळे बाकी कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाही. सरकार जनतेचे आहे. जनतेचे मुख्यमंत्री आहेत मी त्यांच्यासोबत कॅबिनेटमध्ये आहे. जनतेचे लोकच महाराष्ट्रात निर्णंय घेतील असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं
मी रिकामटेकडा नाही
शिंदे गटातील काही आमदारांनी मैत्रीदिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे इच्छा व्यक्ती केली आहे. या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, कोणी काय बोलावे याला राजकारणात महत्व नसतं. परिस्थिती काय याला महत्व असतं. कोण काय बोलले यावर प्रतिक्रिया देण्याइतका मी रिकामटेकडा नाही असे स्पष्ट उत्तर देत या उलट सुलट चर्चेला विराम दिला.