इतक्या मंत्र्यांचा होणार शपथविधी
मुंबई : शिंदे आणि भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आलीय. गेल्या सव्वा महिन्यापासून शिंदे सरकरचा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने विरोधकांकडून निशाणा साधला जात होता. मात्र अशातच आता उद्या 9 ऑगस्ट रोजी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आलीय.
दरम्यान, यावेळी 15 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे समजतेय. त्यामुळे या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच येत्या 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्याचं पावसाळी अधिवेशन पार पडणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. त्यामुळे या अधिवेशनापूर्वीच म्हणजे उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर संध्याकाळीच मंत्र्यांना खाते देण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी कॅबिनेटची बैठकही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी एकूण 15 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात भाजपच्या 8 आणि शिंदे गटाच्या 7 आमदारांचा समावेश असणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाकडून माजी मंत्र्यांना आधी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर भाजपकडून विधानसभेतील आमदारांना आधी संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शपथविधीच्या दिवशीच नेमकं चित्रं स्पष्ट होणार आहे.