देशात काल लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालामध्ये पंजाब वगळता उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये भाजपाने जोरदार कामगिरी करत चार राज्यांमध्येै सत्ता स्थापनेची तयारी सुरु केलीय. एकीकडे या चार राज्यांमध्ये भाजपाचं सरकार येणार हे निश्चित झालेलं असतानाच दुसरीकडे राज्यामधील महाविकास आघाडी सरकारबद्दल पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. निकालाच्या भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी युपी तो सिर्फ झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया दिलीय. तर राज्यातील सरकार अस्थिर होईल का याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं असं ठामपणे म्हटलंय.
कोणत्या कार्यक्रमात बोलले केतकर?
पाच राज्यांमधील निवडणुकांच्या निकालानंतर गुरुवारी सायंकाळी एका वृत्त वाहिनीशी बोलताना कुमार केतकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. कुमार केतकर आणि भाजपाचे खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाग घेतलेल्या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर या निवडणुकीच्या निकालांचा काय परिणाम होईल यासंदर्भात चर्चा झाली त्यावेळीच केतकर यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वत्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.