राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष (आरजेडी) लालू यादव यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. लालू यादव यांच्या पाटणा येथील निवासस्थानी शुक्रवार, २० मे रोजी सकाळी सीबीआयने धाड टाकली आहे. माजी मुख्यमंत्री आणि लालू यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या पाटणा येथील निवासस्थानी सीबीआयचे पथक धडकले असून बिहारमधील गोपालगंज, मध्यप्रदेशातील भोपाळ आणि दिल्ली येथील लालू यादव यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर सीबीआयकडून छापेमारी केली जात आहे.
राबडी देवी यांच्या पाटणा येथील १०, सर्कुलर रोड येथील निवासस्थानावर आज सकाळी ६ वाजता सीबीआयचे अधिकारी पोहोचले. सीबीआय अधिकाऱ्यांनी राबडी देवी यांच्या निवासस्थानी प्रवेश करताच दरवाजे बंद केले आणि यानंतर कुणालाही घरात प्रवेशास मज्जाव करण्यात आला. चार घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांना गेल्या महिन्यातच जामीन मिळाला आहे.
सीबीआयकडून एकाचवेळी १७ ठिकाणी कारवाई केली जात असून चारा घोटाळा प्रकरणातून जामिनावर कारागृहाबाहेर आलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयची ही कारवाई रेल्वे भरतीत झालेल्या घोटाळ्यासंबंधित असून रेल्वेत नोकरीच्या बदल्यात लालू यादव यांनी लोकांकडून त्यांच्या जमिनी आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप आहे.