नवी दिल्ली: संपूर्ण जगात मंकीपॉक्सचा वाढता धोका लक्षात घेता भारत सरकार आता सतर्क झालं आहे. गुरुवारी केंद्र सरकारने राज्यांना मंकीपॉक्सबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
परदेशातून येणार्या लोकांवर सतत मंकीपॉक्ससाठी लक्ष ठेवले जाते आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशपासून केरळपर्यंत काही लोकांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली होती.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, रुग्णाचे नमुने गोळा करण्यात आले असून ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणारा संसर्गजन्य रोग आहे आणि त्याची लक्षणे कांजण्याच्या रुग्णांसारखीच असतात असे स्पष्ट केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच म्हटंल की, मंकीपॉक्सच्या रुग्णांच्या संख्येत आठवडाभरात ७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगभरात मंकीपॉक्सची लागण झालेल्या लोकांची संख्या ६,००० पेक्षा जास्त झाली आहे. तर आफ्रिकेच्या काही भागात या विषाणूमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. मंकीपॉक्सची सर्वाधिक प्रकरणे युरोप आणि आफ्रिकेत आढळून आली आहेत.