जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. भारतात तर पेट्रोलच्या प्रति लिटरच्या दराने कधीच शंभर रुपयांची पातळी ओलांडली आहे तर डिझेलचे दर शंभरीकडे सरकू लागले आहेत. कोरोना संकटातून जग हळूहळू सावरत असल्याने भविष्यात क्रूड तेलाचे दर वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्धार केला आहे.
वर्ष २०३० पर्यंत इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट होते. ते आता २०२३ पर्यंत खाली आणण्यात आले आहे तर पुढच्या वर्षी १० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सर्वच पेट्रोल पंपांवर मिळू लागेल. सर्व प्रकारची वाहने १०० टक्के इथेनॉलवर चालावीत, यासाठी फ्लेक्स फ्यूएल इंजिन विकसित करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन कंपन्यांना केले आहे.
एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत असतानाच दुसरीकडे १०० टक्के इथेनॉलवर चालणार्या गाड्या आगामी काळात रस्त्यावर दिसू लागल्या तर आश्चर्य वाटू नये.