पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटला असून कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर चरणजीत सिंह चन्नी यांची निवड झाली आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी अनेक दिग्गजांची नावे पुढे आलेली मात्र या सर्व दावेदारांना मागे सारत चन्नी मुख्यमंत्री होत आहेत. चन्नी यांच्या माध्यमातून पंजाबला पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री लाभणार आहे.
आज ११ वाजता चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. येत्या ६ महिन्यासाठी चन्नी पंजाबचे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांनतर तेथे निवडणुका होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचं आव्हान चन्नी यांच्यापुढे असणार आहे.
कोण आहेत चन्नी?
चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून ३ वेळा आमदार झाले आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत.पंजाब काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे निकटवर्तीय अशी चन्नी यांची ओळख आहे. अमरिंदर सिंग यांच्या प्रमाणात कमी प्रसिद्ध असणारा चेहरा देऊन काॅंग्रेसने ग्रामीण मतदारांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे.