नागपूर : शस्त्रक्रिया झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर कार्यक्रमात आणि राजकीय, सामाजिक कार्यक्रमात उपस्थित नव्हते. तसेच हिवाळी अधिवेशनाला देखील मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. पण आता अडीच महिन्यांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. (२६ जानेवारी) प्रजासत्तादिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उद्या, बुधवारी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीच्या कण्याचा आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होता. सुरुवातील मुख्यमंत्र्यांनी दुखण्यावर घरीच उपचार घेतले. मात्र दुखणे वाढल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १२ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांवर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल १ तास चालली आणि यशस्वी पार पडली होती. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दोन महिने मुख्यमंत्र्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.
यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधला होता.पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हळूहळू ऑनलाईन बैठकींमध्ये उपस्थित राहताना दिसत आहे.रविवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे शिवसैनिकांना संबोधित केले.
उद्या प्रजासत्तादिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपण लवकरच घराबाहेर पडून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे उद्याच शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची काळजी होती, त्यामुळे अशा काळात मुख्यमंत्रीपदाचा चार्ज दुसऱ्याकडे द्यावा असे आम्ही सांगत होतो. यात टीकेचा कोणताही उद्देश नव्हता.’