मागील काही वर्षांपासून चीनने आपली आण्विक क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून 2030 पर्यंत चीनकडे तब्बल एक हजार अण्वस्त्रे असतील असा अहवाल अमेरिकेची संरक्षण संस्था असणाऱ्या पेंटॅगॉनने प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील माहिती प्रमाणे आज अखेर चीनकडे दोनशे अण्वस्त्रे आहेत. येत्या सहा वर्षांमध्ये हे प्रमाण सातशे अण्वस्त्रांपर्यंत वाढेल आणि 2030 पर्यंत अण्वस्त्रांची संख्या 1000 होईल असे या अहवालात म्हटले आहे.
चीनला आपल्या संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रांमध्ये अमेरिकेशी स्पर्धा करायची असून नौदल, हवाईदल आणि भूदल या बरोबरच अण्वस्त्र क्षमतेमध्येही अमेरिकेपेक्षा जास्त ताकदवान होण्याची चीनची इच्छा आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून येत्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये चीनला 1000 अण्वस्त्रांपर्यंत आपली आण्विक क्षमता पोहोचवायची आहे. मिलिटरी अँड सिक्युरिटी डेव्हलपमेंट इनवोलविंग पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना नावाच्या या रिपोर्टमध्ये भारत आणि चीन यांच्या सीमेवरील घडामोडींचाही आढावा घेण्यात आला आहे. भारताला लागून असलेल्या सीमा प्रदेशात चीनने ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारले असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
पेंटॅगॉनला डिसेंबर 2020 पर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे या अहवालावर आत्तापर्यंत चीनने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.