राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती खुद्द कोकणचे सुपुत्र आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
परंतु सध्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राणे यांनी चिपी विमानतळाची तारीख जाहीर केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एक महत्त्वपू्र्ण माहिती दिली आहे. ‘आम्ही चिपी विमानतळाचे यजमान आहोत. एअरपोर्टचे मालक आहोत. हा उद्योग विभागाचा विषय आहे. नारायण राणे यांच्याबाबत माहीत नाही. पण कोणाला बोलवायचं याबाबत अजून प्रस्ताव आलेला नाही’ असे देसाईंनी सांगितले.
उद्योग विभाग आणि एमआयडीसीने हा प्रकल्प हाती घेतला होता. त्यामुळे आज हे विमानतळ पूर्ण होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ९ ऑक्टोबरला उद्घाटन होत आहे’ अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.
तर ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्धाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी उगाच फुशारक्या मारू नये, असा पलटवार शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच चिपी विमानतळ व्हावं म्हणून मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. केंद्रीय मंत्री गजपती राजू, कॅप्टन पुरी त्या आधी सुरेश प्रभू आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा चार हवाई वाहतू मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. गेल्या सहा वर्षापासून एव्हिएशन कमिटीत हा मुद्दा लावून धरला होता. असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.