सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज झाले असून येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विमानातळाचे उद्घाटन होणार आहे.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या कामाची माहिती दिली. उड्डाणासाठी विमानतळ पूर्णपणे सज्ज झाले आहे, असे यावेळी सांगण्यात आले. उद्घाटनप्रसंगी येणाऱ्या विमानाचे बुकिंग पूर्ण झाले आहे.
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंह, महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी आदी बैठकीला उपस्थित होते.