सात दिवसांत ११ दहशतवादी ठार
दिल्ली : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हसनपोरा भागात रविवारी दुपारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, जिल्ह्यातील हसनपुरा गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू केली. यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्याचे प्रवक्त्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या भागात किती दहशतवादी अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. याआधी शुक्रवारी, एका अधिकाऱ्याने सांगितले की, मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसह रात्रभर चाललेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद (JeM) चे तीन दहशतवादी मारले गेले. त्यामुळे गेल्या सात दिवसांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या ११ झाली आहे.
बडगाममधील जोलवा क्रालपोरा चदूरा येथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने संयुक्त कारवाई सुरू केली. “श्रीनगरमधील नौगाम येथील वसीम मीर असे एका दहशतवाद्याचे नाव आहे. प्राथमिक तपास आणि जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे, इतर दोन दहशतवादी हे परदेशी नागरिक असल्याचे दिसून येत आहे, तथापि, त्यांची खरी ओळख तपासली जात आहे.” पोलिस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार म्हणाले की, घटनास्थळावरून तीन एके-५६ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.