राज्यात सर्वत्रच कोरोनामुळे मागील २ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. गावांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या मात्र रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पाचवी ते सातवीचे वर्ग पुन्हा एकदा सुरू होत आहेत. सोमवारपासून ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू केले जाणार असल्याची घोषणा औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी केली.
शहरातील अजून विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात रविवारी आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी केलेल्या घोषणेचे जिल्हाभरातील शिक्षकांकडून यावेळी स्वागत करण्यात आले. शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्वांना गुड न्यूज देणार आहेत. त्यानंतर आपल्या भाषणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे म्हणाले, आठवी ते बारावीचे वर्ग ग्रामीण भागात सुरू आहेत.
आता पाचवी ते सातवीचे वर्गही सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सोमवारपासून पाचवी ते सातवीचे वर्ग ही ग्रामीण भागात सुरू केले जाणार आहेत. आणि सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असली तरी आता प्रत्येकाची जबाबदारी देखील वाढली आहे. कोरोनाचे नियम पाळावे लागतील. ज्या शिक्षकांनी लस घेतली नाही त्यांनी आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी व निगेटिव्ह अहवाल घेऊनच शाळेत यावे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.