पहिल्यांदा भारताच्या खात्यात पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेच्या पदकाची कमाई
नवी दिल्ली : यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत विविध खेळांमध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. महिला व पुरुष दोन्ही गटातील खेळाडूंनी या सत्रात सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली असून पदकतालिकेत भारत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या खात्यात सहाव्या सुवर्णपदकाची भर झाली तेव्हा या पदकासोबत भारताच्या खेळाडू सुधीरने एक नवा विक्रम देखील प्रस्थापित केला आहे. सुधीरने हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पहिल्या प्रयत्नात २०८ किलो व दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलत स्पर्धेच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
एकूण १३४.५ गुण मिळवत सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग या प्रकारात पहिल्यांदाच भारताच्या खात्यात पदकाची भर घातली आहे. आजपर्यंतचा या क्रीडा प्रकाराचा इतिहास बघता कुठल्याही भारतीय भारोत्तलन खेळाडूने यापूर्वी ही कामगिरी केली नव्हती, त्यामुळे भारतीय क्रीडा जगताकरिता व संपूर्ण भारतीयांकरिता हा अभिमानाचा क्षण होता. सुधीरने केवळ स्वतःच्या नावे विक्रमाची नोंद केली नसून, भारताच्या शिरपेचात देखील मानाचा तुरा खोवला आहे.
एकंदरीतच, भारतीय खेळाडूंच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील या सत्रातील कामगिरीने भारतीय क्रीडा जगताकरिता सकारात्मक व आशादायी चित्र निर्माण केले आहे. येत्या काळात नवोदित खेळाडूंना यामुळे नक्कीच प्रेरणा मिळेल व ऑलिम्पिकसारख्या (Olympics) स्पर्धेत अशाच प्रकारे दर्जेदार प्रदर्शन करण्याकरिता त्यांचा उत्साह व मनोबल वाढण्यास मदत मिळेल.