उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना त्यांना चिरडण्याची घटना घडली. या नंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोलही केला. भाजपवर निशाणा साधत आंदोलनाविषयी पटोले यांनी माहिती दिली.
यावेळी पटोले म्हणाले की, देशात सध्या पुन्हा एकदा हुकूमशाही पाहायला मिळत आहे. मात्र, लोकच त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. सध्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री सत्तेत पाहायला मिळत आहेत. प्रियंका गांधी यांना भाजपने सन्मानाने सोडले नाही तर आम्ही उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करणार आहोत. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार गांधी कुटुंबाला घाबरत आहे.