राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध पुरावे देणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर करत, परळी शहरामध्ये आलेल्या करुणा शर्मा यांना काही महिलांनी रविवारी घेराव घातला. यातच, शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडल्याने खळबळ उडाली आहे. ‘पिस्तुल माझे नसून, मला अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक हे पिस्तुल गाडीत टाकले आहे,’ असा आरोप शर्मा यांनी केला. तसेच त्यांच्यावरच एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटकही केली.
करुणा शर्मा या रविवारी दुपारी परळीत दाखल झाल्या होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शन घेऊन जात असतांनाच त्यांची मंदिर परिसरात काही महिलांशी बाचाबाची झाली. यावेळी करुणा शर्मा यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका महिलेने शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी करुणा शर्मा यांच्याविरोधात एट्राॅसिटी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. करुणा यांना पोलिसा ठाण्यात नेत असतांनाच पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली. तेव्हा कारच्या मागच्या बाजूला पोलिसांना एक गावठी पिस्तुल देखील आढळून आले.
मात्र, या प्रकरणी पोलिसांनी शर्मा यांच्या गाडीत आढळलेले पिस्तूल जप्त केले आहे. या पिस्तूल प्रकरणी यावरून वाहन चालक दिलीप पंडित (रा. अंधेरी) याच्याविरोधात बेकायदेशीर शस्त्रास्त्र प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याला अटक केली असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक ए. राजा यांनी दिली. वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने करुणा शर्मा यांना दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. कारण, प्रत्यक्षात ती बंदूक करुणा यांची नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.