नागपूर: काँग्रेस सत्तेवर असली की भ्रष्टाचार आणि विरोधात बसली की षडयंत्र हीच त्या पक्षाची ओळख आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली आहे. गेल्या चार दिवसांपासून मोदींनी काँग्रेसला अक्षरशः धारेवर धरल्याचे दिसत आहे.
संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात यावरील चर्चेला उत्तर देताना अनेक मुद्द्यांवर त्यांनी काँग्रेसला घेरले. त्यानंतर त्यांनी काल एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.
आज उत्तराखंडच्या श्रीनगर मध्ये प्रचार सभेला संबोधित करताना काँग्रेसवर त्यांनी भ्रष्टाचार आणि षड्यंत्र यांचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की सत्तेवर असली की बेलगाम भ्रष्टाचार आणि विरोधात केली की पूर्ण ताकतीनिशी देशा विरोधात षड्यंत्र करणे हीच काँग्रेसची धारणा आणि ओळख आहे. सत्ता असली की काँग्रेस नेते वाटेल तिथे आणि वाटेल तसा पैसा खातात आणि सत्ता गेली की कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा ते देश विरोधात आंदोलनात उतरतात. वेगवेगळ्या मार्गाने षड्यंत्र करत राहतात. भ्रष्टाचार आणि षड्यंत्र हीच त्या पक्षाची ओळख बनली आहे.
उत्तराखंडची सत्ता असताना त्यांना चार धाम आठवले नाही. देवभूमी आठवली नाही. पण आता आम्ही चार धाम विकास करू देवभूमीचा विकास करू, असे ते म्हणत आहेत. चारधाम विकास हा त्यांच्या दृष्टीने सत्तेच्या खुर्चीकडे जाण्याचा मार्ग आहे, पण उत्तराखंडची जनता काँग्रेसला पूर्ण ओळखून बसली आहे. त्यांनी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याचा पण केला आहे असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
बर्याच दिवसांनी पंतप्रधान मोदी हे पाच राज्यांतील निवडणुकीच्या प्रचारासाठी आज बाहेर पडलेले दिसले. उत्तर प्रदेशातील सहारनपूर मध्ये त्यांनी राहिलेला संबोधित केले. त्यानंतर उत्तराखंडातील श्रीनगरमध्ये मोठ्या सभेला त्यांनी संबोधित केले. दोन्ही ठिकाणी त्यांनी काँग्रेसचा जोरदार समाचार घेतला.