नितीन राऊत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचा धान खरेदी केले जात असल्याच्या तक्रारी मिळाल्या असून यावर नियंत्रण आणून यातील गुन्हेगारांवर कारवाई करावी, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
धान खरेदी केंद्रांच्या कामाचा आढावा बैठक पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी विमला आर. उपस्थित होत्या. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नवीन धान खरेदी केंद्रे सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात 16 धान खरेदी केंद्रे व 4 भरड खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. धान खरेदी करताना निकृष्ठ दर्जाचा धान खरेदी केंद्रात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकारावर आळा यंत्रणांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
उत्कृष्ट धान व्यापारी घेतात व निकृष्ठ प्रकारचा धान खरेदी केंद्रात येत असतात. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. या प्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी पणन विभागाने धाड टाकण्याचे काम केले पाहिजे. हे रॅकेट बाहेर आणण्याची आवश्यकता आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्या, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पणन अधिकारी राजेश तराळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, जिल्हा उपनिबंधक श्री. वालदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे उपस्थित होते