गेले दोन वर्ष सर्व जगाला वेठीला धरलेल्या कोविड १९ ने अमेरिकेचा कणा मोडकळीला आला असून करोना मुळे देशात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. सोमवारी करोना संक्रमितांच्या संखेने पाच कोटींचा आकडा ओलांडला असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले असून वृद्ध आणि करोना लस न घेतलेल्या लोकांमुळे हा आकडा आणखी वाढेल असा इशारा दिला गेला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत २०२१ मध्ये अमेरिकेत करोना बळी अधिक आहेत आणि ज्या प्रमाणात संसर्ग वाढतो आहे त्यामुळे मृत्यूची आकडेवारी धोकादायक पातळीवर जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १ लाख मृत्यू केवळ ११ महिन्यात झाले आहेत. जॉन हापकीन ब्लुमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डॉ. केरी एल्थोक यांच्या मते जो पर्यंत हर्ड इम्युनिटी येत नाही तोपर्यंत मृत्यूचा आकडा वाढत राहणार आहे. अमेरिकेत अजून हर्ड इम्युनिटी आलेली नाही. अमेरिकेत करोनाचा पहिला बळी सियाटल मध्ये ६५० दिवसांपूर्वी नोंदविला गेला होता मात्र अजूनही मृत्यू संख्येवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. फायझरच्या लसीला अमेरिकेने सर्वप्रथम मंजुरी दिली होती तेव्हाच मृत्युंची संख्या ३ लाखांवर होती. या वर्षी एप्रिल मध्ये मॉडर्ना आणि जोन्सनच्या लसीना मंजुरी दिली गेली आहे. या लसी सर्व वयोगटासाठी आहेत.
अमेरिकेच्या वॉशिंग्टन आणि बोस्टन या शहरांच्या लोकसंख्येपेक्षा करोना बळींची संख्या अधिक आहे. दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या अमेरिकन सैनिकांच्या दुप्पट ही संख्या आहे. करोना बळींच्या संख्येत ब्राझील दोन नंबर वर असून येथे ६ लाख १६ हजार मृत्यू झाले आहेत तर भारत तीन नंबरवर असून येथे ४ लख७५ हजार मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत ओमिक्रोनचा फैलाव ज्या वेगाने होत आहे ते पाहता करोनाचे ओमिक्रोन हेच मुख्य व्हेरीयंट बनू शकेल असे आरोग्य प्रमुख एन्थनी फाऊसी यांचे म्हणणे आहे.