राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचं दिसून आलं. देशात ओमिक्रॉनचं संकट असताना अनेक राज्यात नाइट कर्फ्यू लागू आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण असून राज्यात नाइट कर्फ्यू लागू आहे तर दुसऱ्या अधिवेशन सुरु आहे. यातच अधिवेशन काळात विधान भवनातील ३५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मंत्री केसी पडवी यांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
विधिमंडळात पॉझिटिव्ह आलेल्यांच्या संपर्कात कोण कोण आले होते याचा शोध आता घेतला जात आहे. आरोग्य विभागाकडून ट्रेसिंग करण्याचं काम सुरु आहे. यातच मुख्यमंत्री अशा परिस्थितीत अधिवेशनात येण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार असल्यास याबाबत मुख्यंमंत्री कार्यालयाला माहिती देण्यात येणार असल्याचंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित नसल्यानं विरोधकांकडून अनेकदा टीका करण्यात आली आहे. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी इतर कोणावर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पदभार द्यावा, की मुलावरसुद्धा विश्वास नाही असं म्हटलं होतं.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसऱ्या बाजुला २७ डिसेंबरला विधानभवनात सर्व आमदारांची उपस्थिती बंधनकारक आहे. विधानसभा अध्यक्षपद निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने आपल्या सर्व आमदारांना व्हिप बजावला असून भाजप आमदारांना १०० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.