नागपूर जिल्ह्यात दर दिवसाला कोरोनाबाधितांचा विस्फोट होत आहे. तर सर्वत्र उद्रेक पहायला मिळत आहे. नवा व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षा कोरोनाचा धोका वाढला आहे. अचानक बाधितांचा आकडाही फुगला आहे. जिल्ह्यात झालेल्या १२ हजार ५८९ चाचण्यामध्ये ३२९६ जणांना कोरोनाने विळख्यात घेतले. त्यातच ५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे भय वाढले अन प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. मागील २० दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांपेक्षा दुपटीपेक्षा अधिक बाधित होत आहेत. ही अतिशय धोक्यांची सूचना आहे. जिल्ह्यात चाचण्याची संख्या अचानक वाढत असल्यामुळे कोरोनाबाधितांचा टक्का वाढत आहे.
कोरोनाची संख्या वाढत असताना अधिकाधीक कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू करण्यात आल्यामुळे बाधितांचा आकडा फुगत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात दिवसाआड चाचण्यांच्याही संख्येत वाढ होत आहे. बुधवारी (ता.१९) शहरात ९ हजार ६५५ व ग्रामीणमध्ये २ हजार ९३४ अशा जिल्ह्यात १२ हजार ५८९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी तब्बल २६.१९ टक्के म्हणजेच ३ हजार २९६ जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले. बाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूमध्ये वाढ होत आहे.
बुधवारी शहरातील ४ आणि जिल्ह्याबाहेरच्या एकाचा कोरोनाने बळी घेतला. यामुळे कोरोनामुळे तिसऱ्या लाटेत १७ जणांचा जीव गेला आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनाने दगावलेल्यांची संख्या १० हजार १४१ झाली आहे. जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सक्रिय (अॅक्टिव्ह) रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. आज घडिला जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने सोळा हजारापलिकडचा टप्पा गाठला आहे.
जिल्ह्यात १६ हजार २४२ सक्रिय बाधित
सध्यस्थितीत शहरात १३ हजार १३३ आणि ग्रामीणमध्ये २९३९ व जिल्ह्याबाहेरील १७० असे एकूण जिल्ह्यात १६ हजार २४२ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. यापैकी लक्षणे नसलेले सुमारे १२ हजारांपेक्षा आधिक कोरोनाचे रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. तर मध्यम, तीव्र व गंभीर अशी लक्षणे असलेले रुग्ण कोरोनाबाधइत मेयो, मेडिकल, एम्ससह इतर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोरोनाबाधित
शहर -२६७६
ग्रामीण -५२९
जिल्हाबाहेरील -९१
कोरोनामुक्त
शहर -१०५४
ग्रामीण -२३६
जिल्हाबाहेरील -५५