कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेचाही औरंगाबादच्या विमानसेवेला मोठा फटका बसला आहे. विमान कंपन्यांना विमानसेवा रद्द करावी लागत आहे. कोरोनापूर्वी दररोजची चाळीस हजाराची प्रवाशी संख्या अवघ्या सहा हजारावर आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यात पर्यटनस्थळांना लावलेल्या कुलपाने विमान प्रवाशांची संख्या घटली. वाढत्या कोरोनाचा प्रवासी संख्येवर परिणाम होत असल्याने विमान रद्द करण्याची वेळ विमान कंपनीवर आली आहे.
इंडिगोने १३ ते ३१ जानेवारी दरम्यान दिल्ली, मुंबई मार्गावरील ३३ विमानांचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली, मुंबई मार्गावर मोठ्या आणि हैदराबादसाठी छोट्या विमानाद्वारे इंडिगोकडून सेवा दिली जाते. तिसऱ्या लाटेमुळे पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.उद्योग क्षेत्रात पुन्हा एकदा ऑनलाइन कामकाज करण्यावर भर दिला जात असल्याने उद्योग-व्यवसायाच्या बैठकांसाठी होणारा प्रवास टाळला जात आहे. एकूणच परिस्थितीने विमानाचे प्रवासी घटत असल्याने विमानपान कंपन्यांवर विमाने रद्दच करावे लागत आहे. त्यामुळे परिणामी, हॉटेल, टॅक्सी चालकांनाही त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. महिनाभरातील प्रवासी संख्या ४० हजारांपर्यंत गेली होती. परंतु इंडिगोने काही विमाने रद्द केल्याने प्रवासी संख्येत घट झाली आहे, मात्र ही परिस्थिती पुन्हा पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.
”चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पूर्वी दररोज सहा विमानांचे उड्डाण होत होते़ महिनाभरातील प्रवाशी संख्या ४० हजारांपेक्षा जास्त होती. मात्र विमान कंपन्यांनी सेवा रद्द केल्याने प्रवाशी संख्या घटली आहे. प्रवाशी नसल्याने तोटा होतो त्यामुळे कंपन्यांनी हा निर्णय घेतला असावा, ही स्थिती तात्पुरती स्वरूपाची असून लवकरच विमान कंपन्या सेवा सुरू करतील़”