महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला कोरोनाचा प्रसार रोखण्यात महत्त्वपूर्ण यश आले आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. कोरोनाचे निर्बंध उठविण्यात आले असून दुकाने व हॅाटेल्स आता रात्री बारा पर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर बाजारपेठांत या निर्णयाचे स्वागत होत आहे.
साथरोग नियंत्रण कायदा १८९७ आणि आपातकालीन व्यावस्थापन कायदा २००७ अन्वये राज्यात कोरोना साथ नियंत्रणाबाबत नियंत्रणाचे आदेश काढण्यात आले होते. त्यात शिथिलता देण्याबाबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज याबाबतचा आदेश काढला आहे.
मुख्य सचिवांच्या या आदेशामुळे राज्यात सर्वच क्षेत्रात विशेषतः व्यापारी वर्गाने त्याचे स्वागत केले आहे. यामुळे कोरोनाची साथ येण्यापूर्वीची स्थिती निर्माण होण्यास चालना मिळेल. राज्य शासनाने विविध औद्योगिक, व्यापारी संस्था, दुकाने, हॅाटेल्स याबाबत यापूर्वी जारी केलेले निर्बंध उठविले आहे. नव्या आदेशानुसार दुकाने हॅाटेल्स मध्यरात्री बारापर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आहे. अन्य संस्था रात्री अकरापर्यंत सुरु राहतील. यामध्ये स्थानिक प्रशासन स्थानिक स्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करू शकेल.