देशात करोना लसीची टंचाई पूर्णपणे संपुष्टात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. देशात गेल्या नऊ महिन्याच्या आत लसीचे इतके डोस शिल्लक आहेत की, राज्यांनी मनात आणले तर दोन दिवसात लसीकारणाचा आकडा १०० कोटींवर जाऊ शकेल असा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पोहोचविण्यात आलेल्या लस डोसांचा आकडा ८ कोटी पेक्षा अधिक आहे मात्र तरीही गेल्या १२ दिवसात लसीकरणाचा आकडा १ कोटींच्यावर गेलेला नाही असे समजते. परिणामी केंद्राला लसीच्या ओव्हर स्टॉकची चिंता लागली आहे. १६ जानेवारी पासून कोविड १९ लसीकरण सुरु झाल्यापासून प्रथमच इतका स्टॉक झाला आहे. केंद्राने पूर्वीच सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पुरेशी लस देशात उपलब्ध असेल असा दावा केला होता असे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
आत्तापर्यंत एका दिवसात अडीच कोटी डोस देण्याचा विक्रम केला गेला आहे त्यातुलनेत चौपट स्टॉक आजमितीला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसादिवशी एका दिवसात अडीच कोटी पेक्षा अधिक डोस दिले गेले होते मात्र त्यानंतर लसीकरणाचा वेग ५० टक्के घसरला आहे. सर्व राज्यांना लसीकरण वाढविण्याचे आदेश जारी केले गेले आहेत. अर्थात लस मुबलक उपलब्ध होण्यामागे सिरम आणि भारत बायोटेकचे योगदान मोठे आहे. सिरम सध्या महिन्याला २० कोटी डोस पुरवत आहे तर भारत बायोटेकने सुद्धा पुरवठा वाढविला आहे.