देशात एकीकडे करोनाच्या नव्या व्हेरियंट म्हणजेच ओमायक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग देखील वाढवण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत. या सर्व घडामोडीत आता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लसीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिली.
केंद्राकडून लसीची मागणी नसल्यामुळे कोविशील्डचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यापासूनच लसीचे उत्पादन कमी केले जाणार असल्याचेही एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
उत्पादन कमी केले जाणार असले तरी देशाला अचानक मोठ्या प्रमाणात लसीची गरज भासल्यास तेवढा साठा ठेवणार असल्याचेही ते म्हणाले. “मला आशा आहे की अशी वेळ कधीच येणार नाही, परंतु जर गरज पडली तर पुढचे सहा महिने आम्ही लस देऊ शकत नाही, अशी सांगण्याची वेळ मला येऊ द्यायची नाही,” असे पूनावाला म्हणाले. तसेच भविष्यात देशातील जनतेसाठी कोणताही धोका न पत्करता आपण स्पुटनिक लाइट लसीचे २० ते ३० दशलक्ष डोस साठवणार असल्याचंही त्यांनी सांगितले.