शिवसेनेने विधान परिषदेच्या दोन जागांसाठी शिवसेनेने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे कदम यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार सुनील शिंदे तर अकोला-बुलढाणा-वाशीम मतदारसंघातून आमदार गोपिकिशन बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांची भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याशी लढत होणार आहे. ही लढत अत्यंत चुरशीची होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुनील शिंदे हे वरळी मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी त्यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. त्यानंतर सुनील शिंदे यांनी संघटनात्मक कामात स्वत:ला झोकून दिलं होतं. मात्र, आता विधान परिषदेच्या दोन जागा रिक्त झाल्याने मुंबईतून सुनील शिंदे यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेकडे अधिक नगरसेवक असल्याने भाजप एक जागा लढवणार आहे.