पुरस्काराचे स्वरूप ५ कोटी रुपये व सन्मानचिन्ह
स्वच्छ भारत अभियानाचा भाग असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत वैजापूर नगरपालिकेचा देशाच्या पश्चिम विभागातून २२ वा, राज्यात २१ वा विभागात दुसरा क्रमांक आला आहे. या सर्वेक्षणात पालिकेने धडाकेबाज कामे करून शानदार कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार स्वरूपात ५ कोटी रुपये, सन्मानचिन्ह मिळणार आहे.
शहरातील नागरी स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राच्या गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू केले होते. या सर्वेक्षण उपक्रमातर्गंत शहरांनी निर्धारित वेळेत अभिनव पद्धतीने मोहीम राबविणे, ओला व सुका कचरा संकलन व वाहतूक, प्रक्रिया, कंपोस्ट खत निर्मिती व विल्हेवाट, स्वच्छता व हागणदारीमुक्त शहर, माहिती, शिक्षण, संवाद व वर्तनातील बदल, नाविन्यपूर्ण उपक्रम व उत्कृष्ट कार्य ही सर्वेक्षणाची संकल्पना होती. त्यामुळे या उपक्रमातर्गंत नगरपालिका प्रशासनाने डिजिटल फलकांसह, मुख्य ठिकाणी ओपन जिम, बाग विकसित करणे, रस्त्यावरील दुभाजकावर रंगरंगोटी, घरोघरी जावून व ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून ओला व सुका कच-याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्यादृष्टीने जनजागृती केली होती.
यासाठी पालिकेच्या शहरात घंटागाड्या कार्यान्वित केल्या होत्या. घंटागाड्यांच्या माध्यमातून ओला, सुका व प्लास्टिक कच-याचे विलगीकरण करून संकलन करण्यात येत होते. शहरातील संकलित झालेला कचरा पालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या परिसरात टाकून या ठिकाणी कच-याचे विलगीकरण करण्यात येत होते. स्वच्छ व सुंदर शहर हा एकमेव उद्देश ठेवून ही सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत होती. या सर्वेक्षणांतर्गंत वैजापूर पालिकेने देशाच्या पश्चिम विभागातून २२ वा, राज्यात २१ वा व विभागीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीबद्दल पालिकेला पाच कोटी रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे.