विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून पाठवायच्या १२ सदस्यांपैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळून दुसऱ्या नावाची शिफारस राज्यपालांना करण्यात आली आहे. राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस वगळून त्या जागी राष्ट्रवादीने कोणत्या नेत्याची शिफारस केली, याची माहिती मात्र गुलदस्त्यात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्या वेळी राजू शेट्टी यांचे नाव वगळून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या नेत्याची शिफारस करणारे पत्र राज्यपालांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
राजू शेट्टी यांचे नाव त्या यादीत देण्याआधी त्यांनी बारामती येथे जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये दोन ते तीन तास चर्चा झाली. त्यानंतर शेट्टी यांचे नाव त्या यादीत समाविष्ट झाले होते. मात्र, राज्यपालांकडे यादी प्रलंबित असतानाच्या काळात शेट्टी यांनी राज्य सरकारविरोधात पूरग्रस्त शेतकऱ्यांचे दोन मोठे मोर्चे काढले. पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्यासाठी पंचगंगा परिक्रमा सुरू केली आहे. तसेच ५ सप्टेंबर रोजी पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर नरसिंहवाडी येथे जलसमाधी घेण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी उमेदवारी दिली आहे. तरीही शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारच्या विरोधात आंदोलन करत असल्याने सत्ताधारी नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. सरकारमध्ये सामिल होणारी व्यक्तीच जर विरोधात जात असेल तर त्यांची सोबत नकोच अशी मागणी काही नेत्यांनी केली. शेट्टी यांची धोरणे भाजपला पूरक ठरत असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. दुसरीकडे शेट्टी हे भाजपकडून महाविकास आघाडीकडे गेलेले नेते आहेत. त्यामुळे ते भाजपला अप्रिय आहेत. त्यामुळे शेट्टींच्या नावाला दिल्लीतून आक्षेप आहे.त्यामुळे शेट्टी यांचा पत्ता कट झाल्याचे समजते.