अफगाणिस्तान आणि तालिबानच्या हंगामी सरकारला मदत करणाऱ्या सर्व विदेशी सरकारांवर निर्बंध घालण्यात यावेत अशी मागणी करणारे एक विधेयक रिपब्लिकन पक्षाच्या 22 खासदारांनी अमेरिकेच्या संसदेत मांडले आहे. “अफगाणिस्तान काऊंटर टेररीझम, ओव्हरसाईट ऍन्ड अकाउंटॅबिलीटी ऍक्ट’ या नावाचे हे विधेयक सिनेटर जीम रिस्च यांनी सादर केले आहे.
तालिबानला 2001 पासून 2020 दरम्यान मदत करण्यामध्ये पाकिस्तानची भूमिका काय आहे, याची माहितीही या विधेयकाद्वारे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे मागितली आहे. अफगाणिस्तानमधील सरकार उलथवून टाकण्यामध्ये पाकिस्तानचाही हात आहे. तसेच पंजशीर खोऱ्यातील संघर्षात तालिबानला पाकिस्तानची मदत होती, असा संशय या विधेयकातून व्यक्त करण्यात आला आहे.
चीन, रशिया आणि तालिबानकडून संभाव्य आर्थिक, संरक्षण आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताला आर्थिक, उच्चपदस्थ आणि संरक्षण आदी कोणत्या क्षेत्रात सहकार्य केले जाऊ शकेल याबाबत अध्यक्षांचा अहवालही मागवण्यात आला आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यामुळे भारताच्या सुरक्षा वातावरणात होणाऱ्या बदलांचा भारताशी अमेरिकेच्या संबंधांवर कसा परिणाम होईल याची माहितीही या विधेयकातून मागवण्यात आली आहे.