माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे आयकर विभागाच्या रडारावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. आयकर विभागाकडून त्यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता अटॅच करण्यात आल्यामुळे महाविकास आघाडीला हा दुसरा धक्का बसला आहे.
अजित पवारांच्या 1000 कोटींहून अधिक रकमेची संपत्ती आयकर विभागाच्या बेनामी प्रॉपर्टी सेलच्या वतीने अटॅच करण्यात आली आहे. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्याची 600 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर दक्षिण दिल्लीमधील जवळपास 20 कोटींचा फ्लॅटही आयकर विभागाकडून अटॅच करण्यात आला आहे. यासोबत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं मुंबई स्थित कार्यालय निर्मल हाऊस, याची किंमत आहे जवळपास 25 कोटी रुपये ते देखील अटॅच करण्यात आले आहे. याशिवाय गोव्यातील रिसॉर्ट ज्याची किंमत आहे 250 कोटी रुपये हे देखील अटॅच करण्यात आले आहे. यासोबतच महाराष्ट्रातील 27 वेगवेगळ्या जमिनी ज्यांची किंमत जवळपास 500 कोटी सांगण्यात येत आहे, तीदेखील अटॅच करण्यात आली आहे.