31 लाखाचा दंडही भरावा लागणार
पंचकुला येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगला एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डेरा व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी त्याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. इतर दोषी कृष्ण लाल, जसबीर सिंह, अवतार सिंग आणि सबदील आहेत.
साध्वींवरील बलात्कार आणि पत्रकाराच्या हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला 20 वर्षांची शिक्षा न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये सुनावली होती. आता त्याला 19 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याला 31 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
डेरा व्यवस्थापक रणजितसिंग यांच्या खून प्रकरणात राम रहीम आणि चौघांना केंद्रीय विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रणजितसिंग याचा 2002 मध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणात राम रहीमसह डेरा व्यवस्थापक क्रिशन लाल, शूटर जसबीरसिंग आणि सबदिलसिंग यांनाही दोषी ठरवण्यात आले होते. यातील आरोपी इंदर सैन याचा ऑक्टोबर 2020 मध्ये मृत्यू झाला आहे.
या प्रकरणात राम रहीम आणि चार दोषींना खून आणि गुन्हेगारी कट आखणे या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले. तसेच, सबदिल याला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी दिली. या प्रकरणाची सुनावणी दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करावी, अशी याचिका राम रहीमने पंजाब व हरियाना उच्च न्यायालयात करण्यात आली होती. ती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.
रणजितसिंग हा डेराचा माजी व्यवस्थापक होता. राम रहीम याच्यावर अनेक साध्वींनी बलात्काराचे आरोप केले होते. त्यावेळी काही साध्वींनी राम रहीम हा लैंगिक अत्याचार करीत असल्याचे निनावी पत्र सगळ्यांना पाठवले होते. यामागे रणजितसिंग याचा हात असल्याचा राम रहीमचा संशय होता. त्यामुळे 10 जुलै 2002 रोजी त्याचा खून करण्यात आला होता. यात राम रहीमसह क्रिशन लाल, जसबीरसिंग आणि अवतारसिंग आणि सबदिल हे आरोपी होते. यातील आणखी एक आरोपी इंदर सैन याचा 8 ऑक्टोबर 2020 रोजी मृत्यू झाला होता.