राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शरद पवारांची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आता सह्याद्रीवर राज्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देण्यासंदर्भात सादरीकरण होत आहे. यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) चे सादरीकरण सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत.
राज्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देण्यासंदर्भात सादरीकरण झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात एक बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी मुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात होत असलेल्या बैठकीला फार महत्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच इतरही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्तित राहणार आहेत.
राजकीय बैठक होणार?
या बैठकीच्या संदर्भात संजय राऊत यांनी म्हटलं, बैठकीत इतरही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या मुख्यमत्र्यांची बैठक गृहमंत्र्यांनी बोलावली आहे. ज्या राज्यांत नक्षलवाद्यांचा त्रास आहे अशा राज्यांच्या मुख्यमत्र्यांसोबत बैठक आहे. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय बैठक होणार आहे का?