नवी दिल्ली: महाराष्ट्रात जे आता होतंय, ते गेल्या अडीच वर्षात दोनवेळा झालंय. हे तिसऱ्यांदा होतंय. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या पेचातून मार्ग निघेल, याची खात्री आहे,” असं शरद पवार म्हणाले.
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदाची इच्छा असल्याच्या चर्चांवर माध्यमांनी प्रश्न विचारले असता पवार म्हणाले, “मुख्यमंत्रिपद कुणाला देणं हा शिवसेनेचे अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात जसं सरकार चाललंय, ते पाहता बदल करण्याची आवश्यकता वाटत नाही.”
शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न असून, राष्ट्रवादीचा नाहीय, असं पवार म्हणाले. विधान परिषदेत जशा क्रॉस व्होटिंग झाल्या, त्या क्रॉस व्होटिंग होतात, असंही पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत मिळाले संकेत
देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यनितीने राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही पाच उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला हादरा दिला. आघाडीची तब्बल 21 मते फुटली. शिवसेनेची स्वत:ची आणि सहयोगी पक्ष आणि अपक्षांची तब्बल 12 मते फुटली. शिवसेनेचे 55 आमदार आहेत. प्रहार संघटनेचे 2, मंत्री शंकरराव गडाख आणि अपक्ष सहा अशी मिळून शिवसेनेकडे एकूण मतांची संख्या 64 इतकी आहे. मात्र, शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळून 52 मते मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेचे 3 आणि घटक पक्षांची 9 अशी 12 मते फुटली. तर काँग्रेसचे देखील 3 आमदार फुटले. याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला त्याचवेळी महाविकास अघाडी आणि विशेषत: शिवसेनेत सर्वकाही अलबेल नाही हे स्पष्ट झाले होते.