मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्दा दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी केली जात आहे. राज्यभरातून हजारो कार्यकर्ते ठाकरेंच्या पाच जून रोजीच्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. त्यासाठी राज्यभर नोंदणी सुरू करण्यात आली. पुण्यातही नोंदणी सुरू करण्यात आली आहे. पण यासाठी आयोजित बैठकीतच पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.
पक्षाच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी रात्री उशिरा राडा झाल्याचे समजते. राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. यादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. पुण्यात त्यांची सभेतही नियोजन आहे. पण त्यांनी बुधवारी दौरा अर्धवट सोडून मुंबई गाठली. त्यासाठी तब्बेतीची कारण देण्यात आलं आहे. पण राज ठाकरेंची पाठ फिरताच पक्षातील खदखद बाहेर आली.
बुधवारी सायंकाळी पक्षाची अयोध्या दौऱ्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर आणि शिरोळे यांच्यातील वाद शिगेला पोहचल्याने गोंधळ झाल्याचे समजते.
शिरोळे हे पक्षाच्या कोणत्याही बैठकांना बोलावत नसल्याचा आरोप विटकर यांनी केला. यावरून शिरोळे हे विटकरांवर संतापले. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यात झटापट झाल्याची चर्चा आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्येही राड्याला सुरुवात झाली. पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांसमोरच वाद झाल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला.
दरम्यान, मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे मागील काही दिवसांपासून नाराज आहेत. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर ते नाव न घेता उघडपणे टीका करत आहेत. त्यांना पक्षाच्या बैठकांमधून डावलले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे सध्या ते पक्षापासून दुरावल्याची चर्चा आहे. त्यातच मध्यवर्ती कार्यालयात दोन गट भिडल्याने पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे.