नागपूर: हिंगणा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल निलडोह व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परीषद शाळेच्या प्रांगणात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद हायस्कूल निलडोह येथील मुख्याध्यापिका शीला वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा अभिवादनाचा कार्यक्रम दि. ११ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्रीमती नारनवरे (मु.अ.) जि. प. प्राथ. शाळा निलडोह, डॉ. संध्या पवार, मनिषा कदम प्रामुख्याने उपस्थित होत्या.
डॉ. संध्या पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याबद्दल आपल्या भाषणातून सविस्तर असे मार्गदर्शन केले. विपरीत परिस्थितीत प्रवाहाविरुद्ध कार्य करणारे थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्या जीवनाचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांने लक्षात ठेवावा. अभावातुन मार्ग काढत त्यांनी सावित्रीबाई यांना शिकवले. सनातनी वातावरणात स्वतःच्या शाळा काढल्या, त्या यशस्वीपणे चालवल्या. त्यांच्या कार्यामुळेच आज महिला सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत असे भाष्य त्यांनी आपल्या भाषणातून केले.
शाळेतील अध्यापिका डॉ. यमुना नाखले यांनी विद्येविना काय होते याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. मती म्हणजे समज, शिक्षणामुळे आपली समज वाढते, योग्य अयोग्य निवडता येते. बुद्धीमत्ता वाढते. त्यातूनच व्यक्तीला निती कळायला लागते. नीती म्हणजे नीतिमान जीवन जगण्याची रीती. समाज सुसंगत नियमांचे पालन करण्याची व्यक्तिची सवय. ही नीती आली की गती येते. गती म्हणजे आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून प्रगती करणे. या सर्वांच्या संयोगाने आपल्याला संपन्नता प्राप्त करता येते. असे महात्मा फुले यांच्या प्रसिद्ध श्लोकाचे विवेचन डॉ. यमुना नाखले यांनी केले.
कदम मॅडम यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले यांच्या जीवन व कार्याबद्दल माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणातून शीला वानखेडे मॅडम यांनी शिक्षणाशिवाय काय होऊ शकते ते सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वनिता जीवतोडे यांनी केले. कार्यक्रमास दोन्ही शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी, सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.