युक्रेनची राजधानी कीववर रशियाकडून आक्रमण केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियन सैन्याचा मोठा ताफा कीवच्या दिशेने निघाला आहे. रशिया माघार घेण्यास तयार नसल्याने आता कीववर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे कीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना तिथून तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन भारतीय दुतावासाकडून करण्यात आले आहे.
भारतीय दुतावासाने मंगळवारी दुपारी बारा वाजता ट्विट करून याबाबतचे आवाहन केले आहे. ‘विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना सल्ला आहे की, त्यांनी आजच तातडीने कीवमधून बाहेर पडावे. प्राधान्याने उपलब्ध रेल्वेगाड्या किंवा इतर कोणत्याही उपलब्ध माध्यमातून कीव सोडा,’ असं आवाहन दुतावासाकडून करण्यात आलं. आहे. या ट्विटनं भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
भारताने आतापर्यंत सात विमानांमधून जवळपास दीड हजार नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. तसेच जवळपास आठ हजारांहून अधिक भारतीयांना युक्रेन सोडलं आहे. अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये (Ukraine) अडकले आहेत. त्यांनी सुरक्षित शहरांमध्ये जाण्याचे आवाहन यापूर्वीच दुतावासाकडून करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच युक्रेन सरकारने पश्चिम भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. पण आता दुतावासाच्या आवाहनामुळे भारतीयांनाही या युध्दाचा धोका वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
कीवमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. सोशल मीडियात त्यांचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. मागील आठवड्यात कीवमध्ये संचारबंदी होती. त्यामुळे त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. अनेक जण सुरक्षित ठिकाणी थांबले आहेत. पण अन्न-पाणी मिळत नसल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. भारताकडून त्यांना मायदेशी आणण्यासाठी पाऊले उचलली जात असली तरी युध्दजन्य परिस्थितीमुळे अडचणी वाढत चालल्या आहेत.