देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यावेळी त्यांचा ताफा निदर्शकांनी तब्बल १५ ते २० मिनीटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द करावा लागला. यावरूनच भाजपने पंजाबमधील काँग्रेस सरकारवर घातपात करण्याचा डाव असल्याचा आरोप केला. तसेच मोदींच्या सुरक्षेमधील त्रुटीमुळे भाजपने कॉंग्रेसला चांगलेच धारेवर आहे. मात्र असे असतानाच आता कॉंग्रेसने अधिकृत ट्वीटर पेजवरून एक व्हिडिओ पोस्ट करत भाजपने केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. तर महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हा व्हिडिओ रीपोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
‘पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला. मोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.’ असे ट्वीट नाना पटोले यांनी केले आहे.
प्रधानमंत्र्याच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या गोदी मीडिया आणि भाजपचा प्रॉपगंडा फुटला. मोदींच्या ताफ्यासमोर आंदोलनकारी नसून भाजपचे कार्यकर्ते होते, या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदींचा निदर्शकांमुके ताफा १५ ते २० मिनीटे अडकला. आणि ज्या ठिकाणी हा ताफा अडकला तिथून पाकिस्तान फक्त २० किमी अंतरावर होते. त्यामुळे कॉंग्रेसने मोदींच्या घातपाताचा डाव आखल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र कॉंग्रेसने या ठिकाणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात निदर्शक नाही तर भाजप समर्थकांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. यावरूनच कॉंग्रेसने भाजपचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. भाजप समर्थक भाजपचे झेंडे घेऊन मोदींच्या नावाचा जयघोष करतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे भाजपने पंजाबच्या जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र पंजाब माफ करणार नाही. असा इशाराही काँग्रेसने भाजपला दिला आहे