मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. यावरून आज भाजप नेते नितेश राणे यांनी आंदोलकांची भेट घेत राज्य सरकार व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका केली. राणेंच्या या टीकेला शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही. त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का?, असे परब यांनी म्हंटले आहे.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहन केले. दरम्यान त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही, त्यांची मुख्यमंत्र्यांवर आरोप करण्याची पात्रता आहे का? त्यामुळे त्यांच्या आरोपांना आम्ही महत्व देत नाही, असे अनिल परब म्हणाले.
यावेळी मंत्री परब यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. कालपर्यंत 2 हजार एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यापुढे ही कारवाई अधिक कडक करु. एसटी कर्मचाऱ्यांचे कधीही न भरुन येणारे हे नुकसान गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भरुन देणार का? असा सवालही अनिल परब यांनी केला आहे.