पण…रावणाचा उल्लेख कुणास उद्देशून?
महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अशी खोचक टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची नियुक्ती होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचे बोलले जात आहे. यावरून वाघ यांनी निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, ”महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल.” असे खळबळजणक ट्विट त्यांनी केले आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये रावण उल्लेख केला आहे आणि हा उल्लेख नेमका कोणासाठी केला आहे यावरुन चर्चा रंगली आहे. गेल्या काही महिन्यात महिला अत्याचाराच्या व सामूहिक अत्याचाराच्या घटना पुढे आल्या. त्यामुळे महाविकास आघाडीवर टीका होत आहे. त्यात राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्यांचा मुद्दाही प्रामुख्याने पुढे आला आहे. त्यामुळे चाकणकर यांची नियुक्ती केली जाणार असून त्यावर महाविकास आघाडीत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.