काबुल – अफगाणिस्तान सोमवारी झालेल्या भूकंपाने हादरले आहे. पश्चिमेकडे असलेल्या बगदीस प्रांतात सोमवारी दुपारी दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले. यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कमेनिस्तानला लागून असलेल्या सीमेजवळील परिसराला या भूकंपाचा धक्का बसला. एका स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २६ जणांचा मृत्यू झाला असून आकडा वाढण्याची शक्यता आहे.
भूकंपात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. सध्या बचावकार्य सुरु असून भूकंपामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहे. पहिला भूकंप ५.३ रिश्टर स्केलचा आणि दुसरा ४.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.
अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या कदिस जिल्ह्यामध्ये भूकंपामुळे मोठं नुकसान झालं आहे. शुक्रवारी रात्रीसुद्धा पाकिस्तानच्या उत्तरेकडील भागात ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नव्हती.