पिंपरी-चिंचवड येथील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबियांविरोधात १ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, यांची नावे आहेत. या जमीन घोटाळ्यात खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीने अटक केली आहे.
खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसीतील प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये त्यांच्यावर करण्यात आला होता. या भूखंडाची किंमत 31 कोटी होती. मात्र, तो अतिशय नगण्य म्हणजे 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. या प्रकरणात मनीलाँड्रींग झाला असल्याचा ईडीला संशय आहे.
दरम्यान, खडसे यांची 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. लोणावळा आणि जळगाव इथल्या मालमत्तेचा यामध्ये समावेश आहे. भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खडसे यांची ईडीने गेल्या महिन्यात तब्बल 9 तास चौकशी केली होती. भोसरी MIDC भूखंड व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली होती. चौधरी यांच्या अटकेनंतर खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मंदाकिनी खडसे यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी एका निवेदनाद्वारे 14 दिवसांची वेळ मागितली होती.
खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरी येथील जमीन खरेदी केली आहे. मूळ जमीन मालकाकडून ही जमीन 3 कोटी 75 लाख रुपयांना घेण्यात आली. ही जमीन एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे हे दोघे मालक झाले. याच प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यानंतर खडसे यांना महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.