शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. अखेर तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याचवेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलाविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी आज त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतीय.