नागपूर: पुष्कर सिंह धामी यांनी दुसऱ्यांदा उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंग यांनी बुधवारी डेहराडूनच्या परेड ग्राउंडवर एका भव्य शपथविधी समारंभात 46 वर्षीय धामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्यांचे मुख्यमंत्री त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख केंद्रीय मंत्र्यांमध्ये अमित शहा आणि नितीन गडकरी हे प्रमुख होते. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली.
धामी यांच्यासह आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली, त्यापैकी पाच – सतपाल महाराज, सुबोध उनियाल, धनसिंग रावत, रेखा आर्य आणि गणेश जोशी यांनी सलग दुसऱ्यांदा मंत्री म्हणून शपथ घेतली. चंदन राम दास, सौरभ बहुगुणा आणि प्रेमचंद्र अग्रवाल यांना पहिल्यांदाच मंत्री करण्यात आले आहे. शपथविधी सोहळ्यापूर्वी पुष्कर धामी यांनी आज डेहराडूनमधील टपकेश्वर मंदिरात प्रार्थना केली.
सोमवारी संध्याकाळी बलबीर रोडवरील पक्षाच्या राज्य मुख्यालयात निरीक्षक आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सहनिरीक्षक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत धामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने उत्तराखंडमध्ये 70 पैकी 47 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा दोनतृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळवून सत्तेवर आली आहे.तरीही “उत्तराखंड फिर मांगे, मोदी-धामी की सरकार”चा नारा देत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपचे नेतृत्व करणाऱ्या, स्वत: आपल्या पारंपरिक खतिमा जागेवरून पराभूत झाले.त्यामुळे नेतृत्वाला मुख्यमंत्र्यांच्या नावावर नव्याने मंथन करावे लागले, त्याला तब्बल 11 दिवस लागले.