बंडखोर आमदारांमध्ये गुवाहाटी येथे जोरदार अंतर्गत वादावादी
नागपूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर असून आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सहा महत्वाचे ठराव घेण्यात आले. दरम्यान बैठकीनंतर खासदार चंद्रकांत खैरे यांना बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांनी मध्यस्थी करण्यासाठी फोन केला. फोनवर त्यांच्यासह गुवाहाटीतील अनेक आमदार धास्तावले असून आमची येथून सुटका करण्याची विनवणीही बोरणारे यांनी केली. यातच एका राष्ट्रीय पक्षाने तीन दिवसाची वेळ देऊन सर्वांची शुद्ध फसवणूक केल्याची चर्चा फुटीर आमदारात सुरु असून अजून सत्ता स्थापनेचा दिवस उजाडला नसल्याने धास्ती वाढली आहे. बंडखोराचा संयम तुटल्यात जमा असून, लवकरच एकनाथ शिंदे आपला बंडाचा गाशा गुंडाळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे.
गुवाहाटीत मागील दोन दिवसापासून एकनाथ शिंदे आमदारांना वारंवार संयमाचे आवाहन करीत आहेत. मात्र, मतदार संघातील वाढत्या असंतोषामुळे फुटीर आमदारांवर दबाव वाढत आहे. कुटुंबीय धास्तावलेल्या मानसिकतेत आहेत. गद्दारीचा शिक्का, पैसे खाऊन विकले गेल्याचा आरोप होत, असून कुटुंबाला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशा प्रकारच्या व्यथा कुटुंबीय मांडत आहेत. त्यातच या सर्व आमदारांचे मोबाईल काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे कुणाशी संपर्क साधायचा असेल, तर हॉटेलमध्ये असलेल्या ठराविक व्यक्तीला सांगूनच फोन करावा लागतो. त्यामुळेही हे आमदार भयानक त्रस्त झाले असल्याचे वृत्त आहे.
महविकास आघाडी, तसेच शिवसेना नेतृत्व एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली फूट बघून हतबल होईल, हा कयास खोटा ठरला. उलट बंडखोर आता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बंड आवरते घेण्याच्या मनस्थितीमध्ये सर्वच बंडखोर आमदार आले आहेत. फुटीर आमदारांना फक्त तीन दिवस बाहेर थांबण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आज पाच दिवस झाल्यानंतरही सत्ता स्थापनेबाबत काहीच मार्ग दिसत नसल्याने या आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. त्यांच्यात कमालीची अस्वस्थता दिसत आहे. त्यातच दिवस लांबल्याने संयम सुटत चालला आहे. काही आमदारांमध्ये गुवाहाटी येथे जोरदार अंतर्गत वादावादी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.