नागपुरात धावत्या मेट्रोत साजरा झाला जागतिक योगदिवस
नागपूर :- शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी विविध व्यायाम आणि आसने ही गरजेचे आहे. त्यामुळे केवळ खेळाडूंनीच व्यायाम केला पाहि जे असे नसून सर्वांनी नियमित विविध योगासने करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी केले.
नागपूर विद्यापीठाच्या वतीने जागतिक योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन धावत्या मेट्रोत करण्यात आले. माझी मेट्रो आणि नागपूर विद्यापीठाचा क्रीडा विभाग यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमास कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ.राजू हिवसे, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय मुनीश्वर, आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे, मेट्रोचे कार्यकारी संचालक उदय बोरवनकर, व्यवस्थापक सुधाकर उराडे, सह व्यवस्थापक एस.जी. राव, मेट्रोचे प्रसिद्धी विभाग प्रमुख अखिलेश हळवे, ललीत मीणा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ.चौधरी म्हणाले, नियमित योगासनाने अभ्यासातही मन लागते, शिवाय आहारावरही नियंत्रण ठेवता येते. मुलांनी आपल्या मित्रमंडळीसोबत सामूहिकरित्या योगा करावा. तसेच घरच्यांनी सर्वांनी योगा करावा, यासाठी मुलांनी घरच्या मोठ्यांना आग्रह करावा असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी प्र- कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मेट्रोत उपस्थित मान्यवर तसेच विद्यार्थी, खेळाडूंकडून सुक्ष्म व्यायाम जिम्नॅस्टिक प्रशिक्षक युगबहादूर छेत्री यांनी करवून घेतली. तर आसणे योग प्रशिक्षक डॉ. सोनाली काकडे, प्राणायाम डॉ. देवेंद्र वानखेडे यांनी करवून घेतली. या कार्यक्रमात विद्यापीठ क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील फुटबॉल, कराटे, बॅडमिंटन, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स, टेबलटेनिस आणि जिम्नॅस्टिक खेळाचे खेळाडू, खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समध्ये सुवर्णपदक प्राप्त नागपूर विद्यापीठाचा संघ, शहरातील नामवंत खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संघटक, रासेयोचे स्वयंसेवक, विद्यापीठाचे सर्व अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी जिम्नॅस्टिक प्रशिक्षक पल्लवी खंडाळे हिने पारंपारिक वेषात नॉनस्टॉप ७५ मिनिटे विविध योग प्रात्याक्षिक साजरे केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयोचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी तर संचालन क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मानले.