विजय रूपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल आले आहेत. मुख्यमंत्री बदलले तरी पक्षांतर्गत नाराजी कायम असून, मंत्रिमंडळावरून आता वाद सुरू झाला आहे. यामुळे आज दुपारी होणारा मंत्रिमंडळाचा शपथविधी सायंकाळपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. जुन्या सर्वच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नवीन मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार आहे. त्याआधीच भाजपमध्ये वाद उफाळला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सर्व मंत्रिमंडळात बदल हवा आहे. यामुळे अंतर्गत नाराजी वाढली आहे. सुमारे 90 टक्के मंत्र्यांना बदलले जाईल, अशी चर्चा आहे. केवळ एक ते दोन मंत्री नवीन मंत्रिमंडळात कायम राहतील, असे मानले जात आहे. यामुळे मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे.
भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात 21 ते 22 मंत्री असतील. आज त्यांचा शपथविधी होणार होता. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल आणि महिलांची संख्या वाढवली जाईल, अशी शक्यता आहे. यामुळे अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळेल. जातीय समीकरणांचा समतोल राखतानाच स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मंत्रिमंडळात विशेषकरून स्थान मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.
गुजरात हे भाजपसाठी अतिशय महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरातमधील आहे. या राज्यात पराभव होणे भाजपला परवडणारे नाही. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असताना रूपानी हे सक्षम मुख्यमंत्री असल्याचे चित्र जनतेत नव्हते. याचबरोबर रूपानी हे जैन समाजाचे आहेत. आगामी निवडणुकीआधी पटेल-पाटीदार समाजाच्या नेत्याला संधी देऊन या समाजाला खूश करण्याची खेळी भाजपने खेळली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.