एका दिवसात आढळले सव्वा लाख बाधित
जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये फैलावला आहे. तर, ब्रिटन, फ्रान्स, इटलीमध्ये कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद होत आहे. एकाच दिवसात फ्रान्समध्ये जवळपास सव्वा लाख कोरोनाबाधित आढळल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. फ्रान्स व इतर देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी मृतांची संख्या कमी असल्यामुळे कोरोनाशी झुंजणाऱ्या देशांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत फ्रान्समधील शहर मर्से रुग्णालयाचे प्रमुख डॉ. ज्युलियन कार्वेली यांनी म्हटले की, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये बहुतांशी जणांनी लस घेतली नाही. फ्रान्समध्ये शनिवारी एक लाख 4 हजार 611 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवसातील ही सर्वाधिक बाधितांची संख्या आहे. फ्रान्समधील फक्त 76 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संभाव्य धोक्याला फ्रान्स सरकारने अधिक गंभीरपणे घेतले असून दोन डोस घेतलेले नागरिक तीन महिन्यानंतर बुस्टर घेऊ शकतात, असे सरकारने म्हटले आहे.
तर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे इटलीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाच्या 50 हजारांहून अधिक बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 144 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता देशभरात मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.
कोरोनाचा कहर ब्रिटनमध्ये देखील दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी ब्रिटनमध्ये एक लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. बाधितांची संख्या वाढत असली, तरी मृतांची संख्या अतिशय कमी आहे. ब्रिटनमधील लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 50 लाख लोकांनी लस घेतली नाही.