नागपूर: दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३,२१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तर २३ जणांचा मृत्यू झाला आहे. रुणसंख्या वाढल्याने देशातील सक्रिय रुग्णसंख्या ६८,१०८ वर पोहोचली आहे. दिवसभरात ८,१४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गदर वाढून २.७३ टक्क्यांवर गेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
गुरूवारी दिवसभरात १२ हजार ८४७ कोरोना रुणांची नोंद झाली होती. तर, १४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, ७ हजार ९८५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.६४ टक्के नोंदवण्यात आला.
तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.४७ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर २.४१ टक्के नोंदवण्यात आला होता.
कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९६ कोटी ४२ हजार ७६८ डोस देण्यात आले आहेत. यातील ३.५५ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले असून खबरदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी ५ लाख ८४ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ लशींपैकी १३ कोटी १२ लाख १० हजार ५०० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.देशात आतापर्यंत ८५ कोटी ६९ लाख १० हजार ३५२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ५ लाख १९ हजार ९०३ तपासण्या गुरूवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी ४,१६५ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले होते. तर ३ जणांचा मृत्यू झाला. एका दिवसात एकट्या मुंबईत २,२५५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी महाराष्ट्रात ४,२५५ रुग्ण आढळून आले होते. तर या दिवशी तिघांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णसंख्या २१,७४९ वर पोहोचली आहे.