राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि त्यांच्या तीन बहिणींच्या संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाकडून छापेमारी सुरु आहे. या केंद्र सरकारच्या सूडबुद्धी राजकारणाचा मावळ तालुक्यात तीव्र निषेध करत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्गावरील उर्से टोलनाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. अजित पवार यांच्या समर्थनात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली करण्यात आले. मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीत असताना काही भाजप नेते जाणीपूर्वक त्यांना बदनाम करण्याचा डाव आखत आहेत. दादांच्या नातलगांवरील केंद्रीय आयकर विभागाच्या कारवाईमागील पडद्यामागचे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असल्याचा गंभीर आरोप सुनिल शेळके यांनी केला.
अजित पवारांनी कोरोनाची परिस्थिती खंबीरपणे हाताळली
आमदार शेळके म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती खंबीरपणे हाताळली. कोरोना कालावधीत दररोज सकाळी सहा वाजता मंत्रालयात जाऊन राज्यातील परिस्थितीवर देखरेख ठेवणे, अडचणीतील नागरीकांना मदत केली. या कठीण काळात राज्याची आर्थिक घडी सावरली. त्यातून आरोग्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. मंत्रालयात सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आलेल्या नागरिकांचे अजितदादा प्रश्न सोडवितात, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.