महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून गाजत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना विरोधकांवर फैरी झाडल्या. तसेच साखर कारखान्यांबद्दलही त्यांनी यावेळी मोठा खुलासा केला. तसेच त्यांनी म्हटले की, ‘आज मी सर्व कागदपत्रे घेऊन आलो आहे, सगळ्या कागदपत्रांचा खुलासाही यावेळी करणार’, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पवार म्हणाले, मागील काही दिवसांपासून मला सांगायचं होत की, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या बाबतीत बातम्या आल्या त्यामधून माझ्यावर बरेच आरोप करण्यात आले. मात्र यासंबंधीची सत्यता सर्वांना समजली पाहिजे त्यासाठी मी तुमच्या समोर सर्व कागदपत्रांचा खुलासा करत आहे. बऱ्याच चौकशांच्या फेऱ्या झाल्या मात्र त्यामधून काही निषन्न झाले नाही. तसेच साखर कारखान्यांबद्दल खोटी कागदपत्रे सादर करुन माझ्यावर नाहक आरोप राज्यातील विरोधकांनी केले आहेत. 25 हजार कोटींचा घोटाळा हा खोटा आरोप आहे.
मात्र मागील सरकारच्या काळात चौकशी करुनही त्यांना काही मिळाले नाही. सहा कारखाने जिल्हा बॅंकेने कारखाने विकले. तसेच 30 कारखाने राज्य सहकारी बॅंकेने विकले. राज्यातील ६५ कारखाने काही चालवायला दिले तर काही विकले. दुसरीकडे 11 कारखाने 25 वर्षांच्या करारावर चालवायला द्यायचे आहेत. मात्र काही राजकीय विरोधक लोकांची फसवणूक करण्याचे प्रयत्न करत आहे.
जरंडेश्वर कारखाना हनुमंत गायकवाड यांनी चालवायला घेतला होता. मात्र जंरडेश्वर कारखान्यांच्या बाबतीत माझ्या नातेवाईकांची नावे सतत विरोधकांकडून घेतली जात आहे. त्याचबरोबर कारखान्याला बॅकेचे कर्ज द्या आणि नंतर तुम्ही चालवायला घ्या असेही न्यायालयात सांगण्यात आले होते. ज्या लोकांमुळे कारखान्यांचे नुकसान झाले तेच आमच्यावर आरोप करत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार जंरडेश्वर कारखान्याचा व्यवहार झाला होता.